अयोध्यापती "श्रीराम" सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापू के कर्ता गुरु है।
Showing posts with label Marathi. Show all posts
Showing posts with label Marathi. Show all posts

Thursday, 3 April 2014

रामाचा पाळणा - बाळा जो जो रे

08:00 0
Ramacha Palana
रामाचा पाळणा

बाळा जो जो रे कुळभूषणा । दशरथनंदना ।
निद्रा करि बाळा मनमोहना । रामा लक्षुमणा ॥धृ॥

पाळणा लांबविला अयोध्येसी । दशरथाचे वंशी ।
पुत्र जन्मला हृषीकेशी । कौसल्येचे कुशी ॥१॥

रन्तजडित पालखी  । झळके अलौकिक ।
वरती पहुडले कुलदिपक । त्रिभुवननायक ॥२॥

हालवी कौसल्या सुंदरी । धरुनी ज्ञानदोरी ।
पुष्पे वर्षिली सुरवरी । गर्जती जयजयकारी ॥३॥

विश्‍वव्यापकां  रघुराया । निद्रा करी बा सखयां  ।
तुजवर कुरवंडी करुनिया । सांडिन आपुली काया ॥४॥

येऊनि वसिष्ठ सत्वर । सागे जन्मांतर ।
राम परब्रम्ह  साचार । सातवा अवतार ॥५॥

याग रक्षुनिया अवधारा । मारुनि रजनीचरा ।
जाईल सीतेच्या स्वयंवरा । उद्धरि गौतमदारा ॥६॥

परिणिल जानकी सुरुपा । भंगुनिया शिवचापा ।
रावण लज्जित महाकोपा  । नव्हे पण हा सोपा ॥७॥

सिंधूजलडोही अवलीळा । नामे तरतिल शिळा ।
त्यावरी उतरुनिया दयाळा । नेईल वानरमेळा ॥८॥

समूळ मर्दूनि रावण । स्थापिल बिभीषण ।
देव सोडविल संपूर्ण । आनंदेल त्रिभुवन ॥९॥

राम भावाचा भुकेला । भक्ताधीन झाला ।
दास विठ्ठले ऎकिला । पाळणा गाईला ॥१०॥

Read more...

राम बिना कछु मानत नाही ! - संजीवसिंह सुळे, वडगांव

06:21 1
Aniruddha Bapu Ram
राम बिना कछु मानत नाही

एप्रिल २०१३ च्या कृपासिंधु मासिकात प्रकाशित झालेला लेख

नेहेमीप्रमाणे उपासना केंद्रात सद्‌गुरु श्री बापूंच्या प्रवचनाची सी.डी.लावली होती. रामरक्षेवरील प्रवचनाची मालिका पुढे नेत असतांना एक एक ओवी बापू समजावून सांगत होते. आजचं प्रवचन ‘कौसल्येयो दृशौ पातु’ हे होतं. 


कौसल्या म्हणजे काय? कौसल्येची दृष्टी म्हणजे काय?

हे आपल्या नेहेमीच्या सहज शैलीत सांगतांना बापू म्हणाले, 
‘‘राम वनवासातून परत येईपर्यंतच्या पूर्ण काळात कौसल्या एक निमिषभर सुद्धा डोळे उघडत नाही. अयोध्येतून बाहेर पडणार्‍या रामाचं जे रूप तिने डोळ्यात साठवून घेतलं होतं, त्याच स्वरूपाचं ध्यान तिने त्या संपूर्ण काळात केलं. आणि राम वनवासातून परत आल्यावर डोळे उघडून तिने सर्वप्रथम पाहिलं ते रामालाच ! उघड्या डोळ्यांनी असो वा बंद डोळ्यांनी, जागेपणी असो वा स्वप्नात, कौसल्या सतत ध्यान करते ते फक्त तिच्या रामाचंच ! आम्हाला रामाला जिंकायचं असेल तर कौसल्येच्या दृष्टीतूनच त्या रामाकडे पहावं लागतं. तरच साईसच्चरितात वर्णन केलेली "जागत रामा, सोवत रामा.." ही अवस्था प्राप्त होते.’’  

बापूंचं बोलणं ऐकता ऐकता मन नकळत साईसच्चरितात गेले. १९व्या अध्यायातील त्या ओळी डोळ्यासमोर दिसू लागल्या.  

गुरुकृपांजन पायो मेरे भाई  
राम बिना कछु मानत नाही॥

अंदर रामा बाहर रामा 
सपने में देखत सीतारामा॥

जागत रामा सोवत रामा  
जहा देखे वहां पूरनकामा ॥ 

एका जनार्दनी अनुभव नीका  
जहां देखे वहां राम सरीखा ॥

आणि मग साईसच्चरितातील, संत एकनाथांच्या ह्या ओळींचा अर्थ साईसच्चरिताच्याच आधारे शोधण्याची धडपड सुरू झाली. ह्या ओळींमधला ‘गुरुकृपांजन’ हा शब्दच इतका सुंदर आहे की केवळ ह्या एका शब्दावरच एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. 


गुरुकृपांजन म्हणजे काय?

आरंभी दाहक परंतु अंती शीतल असे अंजन जेव्हा डोळ्यात घातले जाते तेव्हा त्या अंजनाच्या प्रभावामुळे दृष्टी आपोआपच स्वच्छ होते, पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट दिसू लागते. आणि गुरुकृपा नेमकं हेच काम करते. प्रारब्धाच्या दाहक झळा सोसल्याशिवाय सहजासहजी न लाभणारी, किंबहुना केवळ ईश्‍वरकृपेनेच लाभणारी गुरुकृपा, एकदा का लाभली की मग गुरुच्या लाभेवीण प्रीतिचा शीतल झरा अखंड वाहू लागतो, असे हे गुरुकृपांजन.

गुरुकृपा आणि ईश्‍वरकृपा याचं हे परस्परावलंबीत्व साईसच्चरितात अगदी सुरुवातीलाच पाहायला मिळतं. दोन शब्द सांगतांना नागेश आत्माराम सावंत यांनी एकनाथी भागवतातल्या २२व्या अध्यायातील ओवी उधृत केली आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे,

गुरुद्वारा पाविजे ज्ञान| तेथे ईश्‍वराचा आभार कोण| 
येथ ईश्‍वरकृपेवीण | सद्गुरुजाण भेटेना ॥

झालीया सद्गुरू प्राप्ती | ईश्‍वरकृपेवीण न घडे भक्ती |
सद्गुरु तोची ईश्‍वरमूर्ती | वेदशास्त्री संमत ॥

हे गुरुकृपांजन शाश्‍वत आणि अशाश्‍वत यातला फरक ओळखण्याची दृष्टी आम्हाला देते; सद्गुरु आणि ईश्‍वर अर्थात परमात्मा आणि परमेश्‍वर यातील साम्य ओळखण्याची दृष्टी आम्हाला देते. सद्गुरु तोची ईश्‍वरमूर्ती हे शाश्‍वत सत्य कळले की मग ‘प्रयास साध्य’ परमेश्‍वरापेक्षा ‘सहज साध्य’ परमात्माच आम्हाला अधिक भावतो. मंगलाचरणात अर्थात पहिल्याच अध्यायात हेमाडपंत म्हणतात की,  

हे साईनाथ स्वप्रकाश | आम्हा तुम्हीच गणाधीश|  
सावित्रीश किंवा रमेश | अथवा उमेश तुम्हीच ॥

तुम्हीच आम्हा ते सद्गुरु | तुम्हीच भवनदीचे तारू |
आम्ही भक्त त्यातील उतारू | पैल पारू दाविजे ॥

आता एकदा का हाच तो देव हे आम्ही स्वीकारले की मग त्याच्या ऐवजी अन्य कोणाचीही कल्पनाच आम्ही करू शकत नाही. 
राम बिना कछु मानत नाही ! मान्यच नाही ! रामाशिवाय अन्य कोणी आम्हाला मान्यच होऊ शकत नाही. 
४५व्या अध्यायात स्वत: साईनाथच आम्हाला निक्षून सांगतात,

संत सृष्टीमाजी उमाप | आपुला बाप तो आपुला बाप| 
साईमुखींचे हे करुणालाप | कोरा स्वहृदयपटावरी ॥

येस, माझा राम तो माझा राम, माझा साईराम तो माझा साईराम, माझा बाप तो माझा बाप ! बाप बिना कछु मानत नाही! आणि एकदा का हा दृढ निश्‍चय झाला की मग सुरू होते ते दृढ ध्यान, अखंड चिंतन, अविरत ध्यास! 


मनाच्या अवस्था 

आपल्या मनाच्या दोन अवस्था असतात. एक, अंतर्मन, आणि दुसरं, बाह्य मन. बरेचदा आम्ही बाह्य जगात बाह्य मनानेच वावरत असतो. ङ्गार थोड्या गोष्टी आमच्या अंतर्मनाला भिडतात. मात्र जेव्हा एखादी गोष्ट ही आतल्या आणि बाहेरच्या, अशी दोन्ही मनांकडून स्वीकारली जाते तेव्हा ती गोष्ट थेट हृदयात जाऊन उतरते. ‘अंदर रामा बाहर रामा’ ही साक्षात हनुमंताची अवस्था आहे. हे अवघड असेल, मात्र अशक्य नक्कीच नाही. कारण ‘त्यानेच’ मला ग्वाही दिली आहे की तू आणि मी मिळून शक्य नाही असं ह्या जगात काहीच नाही. हे कसं जमवायचं ते सांगतांना ३र्‍या अध्यायात हेमाडपंत सोपी युक्ती सांगतात, 

कृपण वावरो कवण्याही गांवा | 
चित्तासमोर पुरलेला ठेवा ॥

जैसा तयासी अहर्निशीं दिसावा |
तैसाची वसावा साई मनीं ॥

जमिनीत पुरलेलं ते गुप्तधन मिळवणं हेच एकमेव उद्दिष्ट त्या कृपणाचं असतं, तेच त्याचं ध्येय असतं, स्वप्न असतं. हृदयस्थ पुरलेलं ते रामधन मिळवणं हेच एकमेव उद्दिष्ट प्रत्येक श्रद्धावानाचं असतं, तेच त्याचं ध्येय असतं, स्वप्न असतं. सपने मे देखत सीतारामा ! हे स्वप्न पाहायचं असतं ते जागेपणी, उघड्या डोळ्यांनी ! त्या सीतारामाला प्राप्त करून घेणं हेच माझं स्वप्न असलं पाहिजे. स्वप्न म्हटलं की आधी आम्हाला आठवते ती झोप. पण इथे स्वप्न म्हणजे उद्दिष्ट असाच अर्थ अभिप्रेत आहे. मात्र संत एकनाथ आम्हाला सामान्य अर्थानेही हेच सांगतात की , तुम्ही जागे असा वा निद्रिस्त असा, चिंतन सुरू असेल ते फक्त रामाचेच. ‘कौसल्येयो दृशौ पातु’ ह्या वाक्याचा अर्थ बापूंनी जो सांगितला आहे तोच इथे नेमका लागू होतो. ‘जागत रामा, सोवत रामा!’ हीच गोष्ट स्पष्ट करून सांगताना ५२व्या अध्यायात हेमाडपंत सांगतात,

जागृती स्वप्न अथवा सुषुप्ति | 
तिहींमाजील कवण्याही स्थितीं ||

जाहलिया साईमय वृत्ति | 
संसार निवृत्ति काय दुजी ॥

इथे संसार निवृत्ती म्हणजे संसाराकडे पाठ फिरवणे नव्हे, तर, अवघाची संसार सुखाचा करीन ही वृत्ती होय. आणि सुख ह्या शब्दाचाच दुसरा अर्थ राम नव्हे काय ? संसार किंवा आम्ही ज्याला प्रपंच म्हणतो तो म्हणजे काय तर, सतत काहीना काही मिळवण्याची चाललेली धडपड, अनंत गरजा, कामना पूर्ण करण्यासाठीची धावपळ. पण आमचा संसारच मुळी जर रामासाठीच असेल, हा राम मिळवणं हीच आमची मनोकामना असेल तर मग हा सर्व संसार आपोआपच राममय होऊन जातो. संसारात ठायी ठायी भरून उरतो तो फक्त हा रामच. जहा देखे वहां पूरनकामा ! हा सुखाचा संसार कसा करायचा हे १ल्या, २३व्या व ३९व्या अध्यायात सांगतांना हेमाडपंत म्हणतात,
श्रवणे साईगुणश्रवण| मनें साईमूर्तीचे ध्यान|
चित्ते अखंड साईचिंतन| संसारबंधन तुटेल॥

चित्त साईनामस्मरणी | दृष्टी साईसमर्थचरणी|
वृत्ति साईध्यानधरणी | देह कारणीं साईंच्या ॥

चित्ते करा हरिगुरूचिंतन | श्रवणे करा चरित्र श्रवण| 
मनें करा ध्यानानुसंधान | नामस्मरण जिव्हेने ॥

चरणी हरिगुरूग्रामागमन | घ्राणी तन्निर्माल्याघ्राणन|
हस्तीं वंदा त्याचे चरण | डोळा घ्या दर्शन तयाचे॥

अशा पद्धतीने प्रयास केल्यास तो सापडतोच अशी स्पष्ट ग्वाही संत एकनाथ महाराज देत आहेत. अनुभव निका! स्पष्ट अनुभव आहे हा! उगीच सांगायचं म्हणून एकनाथ महाराज सांगत नाहीत. त्यांनी जे सांगितलं तो त्यांचा अनुभव सांगितला आहे. कारण मुळात राम हा अनुभवण्याचाच विषय आहे. साईसच्चरितात त्या मद्रासी भजनी मंडळातील बाईने जसा तो जानकी जीवन धनुर्धारी राम अनुभवला अगदी तस्सा! हा राम अनुभवला की मग जो अनुभव येतो तो म्हणजेच ‘जहां देखे वहां राम सरीखा!’ बाळाराम मानकरांनी नाही का त्या सापात सुद्धा बाबांनाच पाहिलं, तसा भाव माझ्याही मनात उमटू शकतो, तसा अनुभव मी ही घेऊ शकतो. १५व्या व २०व्या अध्यायात स्वत: साईनाथ आम्हाला सांगतात की,

ऐसा तुम्हां हृदयस्थ जो मी| तयासी नमा नित्य तुम्ही|
भूतमात्रांच्याही अंतर्यामी | तोच तो मी वर्ततो ॥

यास्तव तुम्हास जो जो भेटे | घरी दारी अथवा वाटे |
ते ते ठायी मीच रहाटें | मीच तिष्ठें त्यामाजी॥

कीड मूंगी जलचर खेचर | प्राणीमात्र श्‍वान शूकर |
अवघ्या ठायी मीच निरंतर | भरलो साचार सर्वत्र॥

असे मी भरलो सर्वांठायी | मजवीण रिता ठाव नाही |
कुठेही कसाही प्रकटे पाही | भावापायीं भक्तांच्या ॥

शेवटी हा भावच तर महत्वाचा असतो ! माझ्या आयुष्यातील रामाचा अभाव दूर करण्यासाठी भक्तीचा हा भाव असणं फार गरजेचं आहे. आणि हा भाव उत्पन्न करण्याचा नितांत सुंदर मार्ग ११व्या अध्यायातील ११वी ओवी आम्हाला दाखवते.
न करिता सगुणाचे ध्याना| 
भक्तिभाव कदा प्रकटेना॥ 

आणि सप्रेम जंव भक्ति घडेना | 
कळी उघडेना मनाची॥

संत एकनाथांनाही हेच सांगायचे आहे की, गुरुकृपांजन मिळाले की डोळे उघडतात, आणि डोळे उघडले की मग मनाची कळी उघडायला वेळ तो काय? मनाचं हे असं कलिका पुष्प उन्मीलन झालं की मग मानव जीवात्मा उद्धारक श्रीरामचंद्राचा अनुभव हा येतोच. माझ्या श्रीरामचंद्राकडे  ह्या उघड्या डोळ्यांनी पाहता पाहता अजून एक गोष्ट लक्षात येते व ती म्हणजे, मी जसा माझ्या रामाकडे पाहतो तसा हा माझा राम सुद्धा सदैव माझ्याचकडे पहातो आहे !

....ज्या उघड्या डोळ्यांनी मला ह्या सगुणाचे, ह्या सावळ्याचे, ध्यान करायचे आहे, त्या डोळ्यांचे रक्षण हा कौसल्येचा राम करो हीच रामनवमीनिमित्त प्रार्थना !
Read more...

Wednesday, 2 April 2014

रामरसायन

06:09 2
Shri Ramrasayan Book Cover Photo

राम रसायन 

प्रभू श्रीरामांच्या कथा आपण सगळेच वर्षानुवर्षे ऐकत आलो आहोत. पिढ्यान् पिढ्या रामायणाने भक्तांना प्रकाशाचा मार्ग दाखविला आहे. अशाचप्रकारे श्रद्धावानांना भक्तीचा मार्ग दाखविणारी प्रभू श्रीरामांची कथा सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी ‘रामरसायन’ मध्ये लिहिली आहे. सर्वांना समजेल अशा अतिशय सोप्या भाषेत प्रत्येक गोष्ट मांडण्यात आली आहे. 

रामायणातील प्रत्येक व्यक्तिमत्वाचे स्वभाव गुणवर्णन बापूंनी अतिशय मोजक्या शब्दांमध्ये चपखलपणे केले आहे. रामाचा धाकटा बंधू श्रीलक्ष्मणाचे स्वभाव वर्णन करताना,
‘‘माझ्या रामाविरुद्ध कुणीही जावो, त्याचा मी पूर्णपणे नायनाटच करीन, ही त्या अनादि अनंत भक्ताची एकमेव धारणा आहे’’, 
इतक्या मोजक्या पण अतिशय सुस्पष्ट शब्दांमध्ये बापूंनी लक्ष्मणाचे संपूर्ण व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यांसमोर उभे केले आहे. यामुळेच गोष्ट वाचताना प्रत्येक प्रसंग मनात ठसा उमटवत जातो. त्यामुळेच रामकथा आधी कितीही वेळा वाचली असली तरीदेखील रामरसायन वाचताना या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात.

प्रचंड मोठे रामायण आजच्या काळातील सर्वांसाठी समजण्यास सोपे व्हावे यासाठी बापूंनी रामायणाचे सार या कथारुपाने रामरसायनमध्ये मांडले आहे. आज वेळेबरोबर धावणार्‍या आपल्यातील प्रत्येकाला मोजक्या वेळात सहजपणे रामकथेतील भक्तीचा आनंद या रामरसायनमुळे लुटता येतो. रामरसायनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वर्णन केलेल्या सर्व व्यक्तिरेखांमधून आपल्याला आपली वर्तणूक कशी असायला हवी, कशी असू नये हे बापूंनी आपल्याला रामरसायनमध्ये दाखविले आहे.

हा रामरसायन ग्रंथ हिंदी आणि मराठीमध्ये उपलब्ध असून आपल्याला आंजनेय पब्लिकेशनवेबसाईटवरुन घरपोच मागविता येईल.

आंजनेय पब्लिकेशन पर लिखी हुई प्रस्तावना 

रामरसायन सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूजी रचित भगवान श्रीराम की जीवणी है मगर यह केवल अनुवाद नहीं है। रामरसायन भगवान श्रीराम की जीवनगाथा जरुर है, परन्तु कुछ हद तक यह घटनाएं हर युग में और सभी मानवों की जिंदगी में घटती हैं। 

हरएक की भूमिका - चाहे वे श्रीराम के सद्गुण हों या रावण की चरित्रहीनता हो, वे हर समय हमारे जीवन में घटते हैं। इन बातों को 'प्रेमप्रवास' (श्रीमाद्पुरुशार्थ ग्रंथराज का दूसरा भाग) में समझाया गया है। पाठक इन बातों को अपने जीवन से जोड़कर इन से निरंतर मार्गदर्शन पाता है। 

यह केवल अपनी पत्नी सीता को दुष्ट रावण के चुंगल से छुड़ाने की बात नहीं है। हम भक्तों के लिए मानो भगवान की यह लड़ाई भक्ति को प्रारब्ध के चुंगल से छुड़ाकर वहीँ ले जाने के लिए है जहाँ से वह आई है - भगवान के पास। 

भगवान एक सामान्य इन्सान की तरह जीवन व्यतीत करते हुए, उपलब्ध भौतिक साधनों की सहायता से और कठिन परिश्रम करते हुए पवित्र मार्ग पर चलकर बुराई पर विजय हासिल करते हैं। यह हमारी प्रेरणा के लिए है। यह पवित्र प्रेम, दृढ विश्वास और हनुमानजी के समर्पण के साथ साथ विपरीत परिस्थितियों में होते हुए बिभीषण के अटूट विश्वास के बारे में है। 

इस की वजह से यह एक 'रसायन' है - यह निरंतर पुनरुद्धार एवं वास्तविक शक्ति का जरिया है। एक ओर, यह हमें वानर सैनिक बनने की प्रेरणा देता है, जो भगवान और राजा श्रीराम के भक्त थे, तो दूसरी ओर सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूजी कहते हैं कि यह रचना दत्तगुरु के चरणों में अर्पण रामगुणसंकीर्तन की पुष्पांजलि है। और यही तो इस रचना की सुन्दरता है। इस रचना में चित्र विस्तृत और गूढ़ हैं जो हमें उन घटनाओं की गहराई तक ले जाते हैं मानो वे घटनाएँ हमारे समक्ष, हमारी जिंदगी में घट रही हैं।

https://www.e-aanjaneya.com/productDetails.faces?productSearchCode=SRRHDL

More About Book
Publisher: Ashirwad Enterprises
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Jul 2008 
Publication Type: Book
Price: Rs.150.00
Read more...